मुंबई - काश्मीर आमचेच आहे, आमचेच राहणार म्हणून कलम 370 हटविल्याचा विजयपताका शिवसेनेच्या रुपाने इस्लामाबादच्या रस्त्यावर फडकल्या. पाकिस्ताने आता गप्प राहावे. भारताशी व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याच्या गोष्टी करुन हा धोंडा तुम्हीच तुमच्या पायावर पाडून घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे त्रिवार अभिनंदन केले पाहिजे अशा शब्दात शिवसेनेने पाकला टोला लगावला आहे.
काश्मीरातील कलम 370 हटवल्यामुळे पुलवामासारख्या घटना पुन्हा घडू शकतील असं गंभीर वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. त्याचा सरळ अर्थ पुलवामा येथील जवानांवर झालेला हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तान होते हे सिद्ध होतं असंही शिवसेनेने सांगितले आहे.
सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे
- पुलवामा घटनेमुळे भारताच्या रगात राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली. व त्यातूनच काश्मीरातून कलम 370 हटवायलाच हवे या विचारांना बळ मिळाले.
- वाईटातून कधी कधी चांगले घडते. 40 जवानांच्या बलिदानातून जो अंगार देशात उफाळून आला त्यात 370 कलमाची राख झाली.
- आमच्या दृष्टीने काश्मीरचा प्रश्न संपला आणि आता विषय राहिला आहे तो पाकने बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या काश्मीरविषयी. तो विषयही लवकर निकाली लागेल.
- अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार होत आहे व हा वारू आता कोणीही अडवू शकत नाही.
- कलम 370 चा खात्मा केल्यानंतर इस्लामाबादच्या रस्त्यावर शिवसेनेची पोस्टर्स व बॅनर्स झळकले. याचा अर्थ असा की, पाकड्यांचा हद्दीत शिवसेना घुसली आहे. लवकरच हिंदुस्थानची सेनाही घुसेल व तसे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.
- इस्लामाबादेतील हिंदुस्थानी राजदूतांना परत पाठवले जाईल व पाकिस्तानी राजदूतांना हिंदुस्थानातून माघारी बोलवले जाईल. गेली अनेक वर्ष शिवसेनाच ही मागणी करत होती की, हिंदुस्थानातील पाक दूतावासांना टाळे लावा. कारण पाक दूतावासातूनच येथील फुटिरवाद्यांना बळ मिळत आहे.
- काश्मीरमधील दहशतवाद्यांचे पोशिंदे हे दिल्लीतील पाक दूतावासात येतात आणि हिंदुस्थानातील कारस्थाने करतात हे लपून राहिले नाही. मुळात या दोन्ही देशात कोणतेही भावनिक संबंध राहिलेच नाहीत.
- हिंदुस्थानाशी व्यापार तोडून त्यांनी काय मिळवले? पाकिस्तानात असा कोणता महाग उद्योग बहरला आहे की, त्यातून दोन देशांतील आयात-निर्यातीस चार चांद लागले आहेत. पाकिस्तान आजही गावंढळ पद्धतीने जगत आहे.