Join us

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच

By मनोहर कुंभेजकर | Published: September 24, 2024 7:13 PM

संपूर्ण जोगेश्वरी परिसरात 'जोगेश्वरीच्या जनतेचा एकच निर्धार, यावेळी भाजपाचा आमदार' असा मजकूर असलेले बॅनर

मनोहर कुंभेजकर, मुंबई: जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात माजी नगरसेविका उज्वला मोडक यांच्यानंतर आता उत्तर पश्चिम भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वोदय नगर या ठिकाणी एकत्र येऊन उमेदवारीसाठी मागणी केली. जोगेश्वरी विधानसभा अध्यक्ष मंदा माने यांनी जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे तीन नगरसेवक असून शिंदे गटाचे २ नगरसेवक आणि भाजपाचे २ नगरसेवक कमी मताधिक्याने पडले आहेत. मात्र भाजपने मागील काही वर्षात प्रत्येक प्रभागात पक्ष संघटना मजबूत केल्याचा दावा केल्यामुळे कार्यकर्त्याने इच्छा बोलून दाखवली आहे.

भाजपाने लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेसाठी काम केले. त्यामुळे आता भाजपाला विधानसभेत उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी दावा केला आहे. संपूर्ण जोगेश्वरी परिसरात 'जोगेश्वरीच्या जनतेचा एकच निर्धार, यावेळी भाजपाचा आमदार' असा मजकूर असलेला बॅनर लावण्यात आला आहे.

दोन दिवसापूर्वी माजी नगरसेविका उज्वला मोडक यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेऊन मतदार संघ भाजपाला मिळावा यासाठी निवेदन दिले. तर आज जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांच्या समर्थकांनी एकत्रित येऊन त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी घोषणाबाजी केली. यामुळे अगोदर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागेवरून सुरू असलेली रस्सीखेच अद्यापही थांबली नाही. या मतदारसंघात मोडक आणि मेढेकर यांच्यात रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही जागा भाजप लढणार का शिंदे सेना लढणार याकडे राजकीय पक्ष व मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबईभाजपाएकनाथ शिंदेशिवसेना