Join us

बदनामी करणाऱ्या ‘त्या’ महिलेला रोखा, राहुल शेवाळे यांची हायकोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 6:04 AM

खासदार शेवाळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी संबंधित महिलेने गेल्या वर्षी जुलै महिन्यात केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला आपल्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित न करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

खासदार शेवाळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी संबंधित महिलेने गेल्या वर्षी जुलै महिन्यात केली होती. तसेच तिने सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेवाळेंविरोधात मजकूरही पोस्ट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा नोंदविण्याची विनंतीही महिलेने केली होती. या सगळ्याची दखल घेत संबंधित महिलेवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, इंडियन ब्रॉडकास्टिंग फेडरेशन आणि ट्विटर यांना द्यावेत, अशी मागणी शेवाळे यांनी याचिकेद्वारे केली आहे. संबंधित महिलेच्या खोट्या आरोपांमुळे वैयक्तिक जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.  संबंधित महिला कोणाच्या तरी वतीने खोटे आरोप करत असल्याचेही शेवाळे यांनी याचिकेत नमूद केले आहे. याचिकेवर २४ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अशी झाली ओळख

फेब्रुवारी २०२० मध्ये एका जवळच्या मित्रामार्फत माझी व संबंधित महिलेची भेट झाली. कोरोनामुळे तिची आर्थिक स्थिती खालावल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे तिला मी मदत केली. तिने माझ्याकडून ५६ लाख रुपये घेतले असल्याचे शेवाळे यांनी याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही.

टॅग्स :राहुल शेवाळेमुंबई हायकोर्ट