मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 08:46 AM2024-11-27T08:46:42+5:302024-11-27T08:47:27+5:30
महायुतीच्या विजयात आमचाही वाटा असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून मांडली जात होती.
Eknath Shinde ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीत निर्माण झालेला मुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्याने आमच्या पक्षाचाच मुख्यमंत्री व्हायला हवा, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र महायुतीच्या विजयात आमचाही वाटा असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून मांडली जात होती. परंतु भाजप नेतृत्वाने या मागणीबाबत प्रतिकूलता दाखवत शिंदे यांना इतर दोन पर्याय दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे समजते.
भाजपला १३२ जागा मिळाल्या असल्याने आपलाच मुख्यमंत्री हवा, अशी मागणी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. त्यामुळे केंद्रातून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर्स देण्यात आल्या. आपण राज्यात उपमुख्यमंत्री व्हावं किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, असा प्रस्ताव भाजप नेतृत्वाने दिल्याची चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदे हे या दोन्ही ऑफर्स स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती आहे. तसंच मागणी करूनही मुख्यमंत्रिपद दिलं जात नसल्याने या स्पर्धेतूनही शिंदे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
भाजप आमदारांची लवकरच बैठक
शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना, तर अजित पवार गटाने अजित पवार यांना आधीच विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले आहे. भाजपबाबत प्रतीक्षा आहे. सूत्रांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत भाजपच्या आमदारांची नेता निवडीसाठी मुंबईत बैठक होईल. या बैठकीसाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक येणार आहेत. ही बैठक गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदी कोण ३० नोव्हेंबरपर्यंत ठरणार
मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले. त्यावरून २ डिसेंबरला शपथविधी होईल असा तर्क दिला जात आहे.