Join us

शिवसेनेनं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 3:22 PM

संधीसाधू लोक आज आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या सरकारवर गोळी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत

मुंबई  - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. दुसरीकडे या मुद्द्यावरुन राजकारणही तापताना दिसून येत आहे. सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून सरकारने दिल्ली गाठून आरक्षणाचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यातच, सर्वच नेत्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधकांच्या टीकेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीसांनी मी जातीनं ब्राह्मण असल्याने सॉफ्ट टार्गेट केल्याचं म्हटलं. त्यावर, आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. 

संधीसाधू लोक आज आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या सरकारवर गोळी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता, तर मराठा समाजाच्या मोर्चावर टीका करताना त्यांनीच सामनातून काय शब्द लिहिला होता, काय म्हटलं होतं हे सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण त्यांनी घालवले, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. तसेच, मी जात बदलू शकत नाही, मग जातीने ब्राह्मण असल्यानेच सॉफ्ट टार्गेट करण्याची काहींची मानसिकता दिसून येत असल्याचंही फडणवीसांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं. त्यावर, संजय राऊत यांनी हा जातीभेद न माननारा महाराष्ट्र असल्याचं प्रत्युत्तर दिलं. 

महाराष्ट्रात कर्तबगारीला महत्त्व

महाराष्ट्रात जाती-पातीसंदर्भात अशी भाषा यापूर्वी कोणी केली नव्हती. महाराष्ट्राने बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यासारखा मुस्लीम मुख्यमंत्री स्वीकारला आहे. दलित मुख्यमंत्री स्वीकारला आहे. या राज्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला. तेव्हाही महाराष्ट्राने त्या निर्णयाला विरोध केला नाही. कारण, महाराष्ट्रात कर्तबगारीला महत्त्वं आहे, जातीला नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे तो यासाठीच. महाराष्ट्र हा जात-पात, धर्म न मानता राजकारण समजाकारणात काम करतोय.

तर शिंदे विधानपरिषदेवर जातील - फडणवीस

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असून, विधानसभा अध्यक्ष त्यांचा निर्णय देतीलच; पण कायद्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा प्रकारच्या प्रकरणात काय निकाल पूर्वी आले याची कल्पना ज्यांना आहे, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा त्यांचे आमदार अपात्र ठरणार नाहीत, याची खात्री आहे, मलादेखील तीच खात्री आहे. मी हेही सांगतो की, हा जरतरचा विषय आहे; पण समजा शिंदे विधानसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले तरी त्यांचे मुख्यमंत्रिपद जाणार नाही, ते विधान परिषदेवर जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसशिवसेनासंजय राऊतमराठा आरक्षण