Join us

वृद्ध निराधार महिलेला शिवसेनेने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 8:52 PM

अंधेरी पश्चिम  शिवसेना शाखा क्रमांक ६३ ज्ञानेश्वर गार्डनच्या मागे ६५ वर्षीय एक वृद्ध महिला निराधार असल्याचे लक्षात आले.

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई- ज्याच्या मागे कोण नसते त्याच्या मागे परमेश्वर असतो याची प्रचिती एका वृद्ध महिलेला आली आणि सदर वृद्ध निराधार महिलेला शिवसेनेने आधार दिला आहे. आंबोली पोलिसांच्या मदतीने  काल दि,३ रोजी सदर वृद्ध महिलेची विरा देसाई रोड येथील जीवन आशा आश्रमात सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,अंधेरी पश्चिम  शिवसेना शाखा क्रमांक ६३ ज्ञानेश्वर गार्डनच्या मागे ६५ वर्षीय एक वृद्ध महिला निराधार असल्याचे लक्षात आले. लगेचच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण या संकल्पनेचे अनुकरण करून  गटप्रमुख  महेश धावडसकर आणि समाजसेवक वसिम अब्दुल खान यांनी ही गोष्ट शिवसेना शाखा क्र. ६३ चे शाखाप्रमुख सुबोध चिटणीस यांच्या नजरेस आणली.

 चिटणीस यांनी त्वरीत त्यांनी आंबोली पोलिस स्टेशनची मदत घेतली असता वृद्ध महिलेचे नाव शशिकला रमेश कांबळे आहे आणि तिचे जवळचे नातेवाईक कोणीच नाहीत आणि रहावयास घरही नाही हे लक्षात येताच. त्वरीत डाॅ सुनाली वैद्य यांच्या मदतीने जिवन आशा आश्रम (सेंट कॅथरिन) अंधेरी पश्चिम विरा देसाई रोड येथे संपर्क करून त्यांची व्यवस्था केली. त्याच बरोबर आंबोली पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बाळासाहेब पोटे यांनी सदर महिलेचे नातेवाईक मिळेपर्यत जीवन आशा आश्रम येथे राहण्यासाठी त्यांना ना हरकत पत्र आश्रमाच्या नावे बनवून दिले. आणि काल दि,३ रोजी सदर वृद्ध महिलेची आश्रमात सुरक्षित व्यवस्था करण्यात आली. 

आंबोली पोलिसांनी व जिवन आशा आश्रम यांनी वेळीच तत्परता दाखवत केलेली मदत व शिवसेनेची सामाजिक बांधिलकी यामुळे या निराधार महिलेला आधार मिळल्याचे सुबोध चिटणीस यांनी लोकमतला सांगितले.आपली सुरक्षित व्यवस्था केल्या बद्धल सदर महिलेने शिवसेनेला आणि आंबोली पोलिसांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :शिवसेना