‘आरे’तील कारशेडवरून शिवसेना झाली आक्रमक; मनमानी सहन करणार नाही - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:05 AM2019-09-11T03:05:33+5:302019-09-11T03:06:21+5:30
वन्यजीवांच्या अधिवासावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडमुळे फक्त दोन हजार झाडे कापली जाणार नसून वन्यजीवांचा अधिवासच धोक्यात येणार आहे. मुंबईतील जैवविविधता, पर्यावरणच कारशेडमुळे धोक्यात येणार आहे. या प्रश्नावर कोणाचीही मनमानी खपवून घेणार नसल्याचे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी आरेबाबत आक्रमक भूमिका घेतली.
शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी आरे येथील कारशेडविरोधातील भूमिका पुन्हा स्पष्ट केली. या वेळी आदित्य यांनी आरे वसाहतीतील वन्यजीवांबाबतचे एक सादरीकरणही केले. कारशेडच्या मुद्द्यावर मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मनमानी करत आहे. शिवसेनेचा मेट्रोला अजिबात विरोध नाही. फक्त ‘आरे’मधील कारशेडला विरोध आहे. मुंबईसाठी मेट्रो आवश्यक आहे. मात्र, आरे कारशेडचा विषय वेगळा आहे. हा केवळ वृक्षतोडीशी संबंधित विषय नाही, तर संपूर्ण पर्यावरण व जैवविविधता धोक्यात येणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आरे येथील कारशेड अन्यत्र हलविल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका मेट्रा प्रशासनाने घेतली आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची ही भूमिका न्यायालयासह मुंबईकरांना धमकावणारी आहे. कारशेडला पर्यायअसतानाही आरेचाच हट्ट धरला जात आहे. मुंबईकरांचा विरोध होत असतानाही अन्य पर्यायांचा विचार का झाला नाही, हजारो कोटींची फी घेणारी तुमची सल्लागार कंपनी नक्की काय करत होती, त्यांनी इतके वर्षे कसले सल्ले दिले की हा एक प्र्रकारचा घोटाळाच केला, अशी प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्यांकडे प्रकल्प सोेपवावा
अश्विनी भिडे व त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांना ‘आरे’च्या कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण करता येणार नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अधिकाºयांना बाजूला करावे. त्यांच्या जागी सक्षम व मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणाºयांकडे प्रकल्प द्यावा, अशी मागणीही आदित्य यांनी केली.