शिवसेनेला चेंबूरमध्ये ‘दे धक्का’
By admin | Published: April 21, 2016 03:12 AM2016-04-21T03:12:35+5:302016-04-21T03:12:35+5:30
महापालिकेच्या निवडणुकांपूर्वीच पक्षांविरोधी आणि पक्षांतर्गत राजकारण आता रंगू लागले आहे. चेंबूरमधल्या घाटला गावातील नागेश तवटे यांनी तब्बल ३०० शिवसैनिकांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकांपूर्वीच पक्षांविरोधी आणि पक्षांतर्गत राजकारण आता रंगू लागले आहे. चेंबूरमधल्या घाटला गावातील नागेश तवटे यांनी तब्बल ३०० शिवसैनिकांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्यात चेंबूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे शाखाप्रमुख नागेश तवटे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु तेव्हा त्यांना केवळ ४ हजार ३१७ मते मिळाली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. परिणामी, आता तवटे यांनी भाजपात प्रवेश केल्याने स्थानिक स्तरावरचे राजकारण आता आणखी चुरशीचे होणार आहे.
१० जानेवारी रोजी चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १४७ मध्ये पालिकेची पोटनिवडणूक झाली होती. येथील काँगे्रसचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी नगरसेवकपदाचा व काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. शिवाय, शिवसेनेत प्रवेश केला होता. परिणामी, येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेंद्र नगराळे आणि शिवसेनेने अनिल पाटणकर यांना उमेदवारी दिली होती, तर शिवसेनेचे शाखाप्रमुख नागेश तवटे यांनी बंडखोरी करत, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पोटनिवडणुकीत काँगे्रसचे उमेदवार राजेंद्र नगराळे यांना मागे टाकत, शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी बाजी मारली होती. पाटणकर यांना ११ हजार ५१७ मते मिळाली होती. नगराळे यांना ४ हजार ८९० मते मिळाली होती, तर शिवसेनेशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढलेले उमेदवार नागेश तवटे यांना ४ हजार ३१७ मते मिळाली.
दरम्यान, येथे झालेल्या पोटनिवडणुकीने स्थानिक राजकारण ढवळून निघते, तोवर आता चेंबूर घाटला येथील माजी शिवसेना शाखाप्रमुख नागेश तवटे यांच्यासह ३०० शिवसैनिकांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अनिल ठाकूर यांची निवड घोषित करण्यासाठी आयोजित सभेत हे प्रवेश करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘ना’राजीनामा...
१चेंबूरच्या घाटला-बोरला प्रभाग क्रमांक १४७ मध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोकवस्ती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे शिवसेनेचाच नगरसेवक होता. मात्र, गत पालिका निवडणुकीत सेनेला मागे टाकत काँग्रेसचे उमेदवार अनिल पाटणकर यांनी विजय प्राप्त केला होता. मात्र, काही कारणात्सव त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला, शिवाय शिवसेनेत प्रवेश केला.
२सेनेतून पाटणकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर, बंडखोरी टाळण्यासाठी चार ते पाच दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये स्थानिक शाखाप्रमुख नागेश तवटे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, नागेश तवटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवाय, काँग्रेसने ज्या राजेंद्र नगराळे यांना उमेदवारी दिली होती. ते नगराळे मनसेच्या स्थापनेपासून सक्रिय कार्यकर्ते होते, पण त्यांनी मनसे सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
‘मी आहे तेथे समाधानी...’
‘मनसे’त गुढीपाडव्यानंतर चैतन्याऐवजी निराशा; नगरसेवकांची मनसेलाच ‘जय महाराष्ट्र’ची तयारी’ अशा आशायाचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित करताच, मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी त्यावर स्पष्टीकरण केले आहे. आपल्याविरोधातील चर्चा ही विरोधकांनीच पेरली आहे. राज ठाकरे यांचा मी विश्वासू कार्यकर्ता आहे. मला कोणत्याही पक्षात जाण्याची आवश्यकता नाही. मी आहे तेथे समाधानी आहे, असे लांडे यांनी म्हटले आहे.