मुंबई : शिवसेनेला पटकणारा आजवर कोणी जन्माला आला नाही आणि यापुढेही जन्मणार नाही. आम्हाला कोणी लेचेपेचे समजू नका. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. आम्ही लाटेची वाट लावतो. इथे फक्त शिवसेनेची भगवी वाट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांना चोख प्रतिउत्तर दिले.
वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये स्थानिक लोकाधिकार समितीच्या ४५ व्या अधिवेशनात उद्धव यांनी मोदी-शहा जोडगोळीवर जोरदार निशाणा साधला. गेल्या आठवड्यात लातूर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अमित शहा यांनी, मित्रपक्ष सोबत आले तर ठीक; अन्यथा त्यांनाही पटकू, अशी भाषा केली होती. शहा यांच्या वक्तव्याचा ठाकरे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाची ताकद दाखवण्यासाठी निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन करताना उद्धव म्हणाले की, काही जण काम न करता टिमकी वाजवत आहेत. २०१९ नाही तर, पुढची सगळी वर्षे आपलीच सत्ता राहाणार असल्याचा दावा केला जात आहे.
मग देशाचे काय होणार? मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. ताकाला जाऊन भांडे लपवायची मला सवय नाही, असे सांगत निवडणुकीसाठीच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्याचे उद्धव म्हणाले. आगामी निवडणूक ही देव, देश आणि धर्मासाठीच लढली गेली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. मुंबईत शिवसेनेमुळेच मराठी माणसाला त्याची ताकद कळली. त्यातूनच त्यांना नोकऱ्या मिळाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला....तेव्हा कोर्टाला का विसरलात?तुमचा सर्व ‘शक्तिमान’ आणि विष्णूचा अवतार असलेला नेता जर राम मंदिर बांधू शकणार नाही, तर मंदिराचा मुद्दा काढताच कशाला, असा सवालही उद्धव यांनी भाजपाला केला. जेव्हा मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते, तेव्हा हा प्रश्न कोर्टात असल्याचे का विसरलात, असा प्रश्नही त्यांनी केला.