मुंबई: मनसेने आगामी 23 जानेवारीला महाअधिवेशन आयोजित केलं असून या अधिवेशनात मनसेप्रमुखराज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकत्व कायदा तसेच राज्यात स्थापन झालेलं महाविकाआघाडीच्या सरकारबाबत राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. मात्र मनसेच्या महाअधिवेशनाच्या दिवशीच शिवसेनेकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या निमित्ताने 'जल्लोष' मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
शिवसेनेचे मंत्री अॅड. अनिल परब शिवसेनेच्या जल्लोष मेळाव्याबाबत म्हणाले की, 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरे यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमाला जल्लोष मेळावा असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवणार असं उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिले होते. त्यामुळे बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण केल्याने उद्धव ठाकरे यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यामध्ये देशातील बड्या नेत्यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगतिले.
शिवसेनेच्या जल्लोष मोळाव्यामध्ये ५० हजार लोक येणार असून देशातील राजकीय नेते, उद्योजक आणि सिने कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. तसेच मनसेच्या अधिवेशनाला देखील आमच्या शुभेच्छा असल्याचे अनिल परब यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता शिवेसना आणि मनसेच्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. मात्र राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.
...अन् अखेर स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली मनसेबाबत 'राज की बात'
नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं