शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार बदलला; हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:49 PM2024-04-03T18:49:12+5:302024-04-03T18:55:19+5:30
राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाचा गुंता अद्यापही सुटत नसल्याचे दिसून येत आहे.
मुंबई - शिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीतील जाहीर उमेदवार बदलण्यात आला असून हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे, गेल्या ४ दिवसांपासून हिंगोलीतील उमेदवारीवरुन मुंबईत राजकीय वातावरण तापलं होतं. अखेर हेमंत पाटील यांची उमेदवार रद्द करुन हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाचा गुंता अद्यापही सुटत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीत काही जागांवरुन वाद आहे. त्यातच, महायुतीमध्ये भाजपाकडून शिवसेना शिंदे गटावर दबाव टाकला जात असल्याचे समजते. नाशिक, हिंगोलीसह यवतमाळ मतदारसंघातील उमेदवारीवरुन जोरदार चर्चा आहे. शिवसेनेने हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांची उमेदवारी रद्द करुन नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. तसेच, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार बदलण्यावर मुंबईत खलबतं सुरू असल्याचे समजते. यवतमाळ-वाशिमधून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे, भावना गवळी यांचाही पत्ता कट झाल्याचे दिसून येते. राजश्री पाटील ह्या हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत.
दरम्यान, हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्यावर मतदारसंघात नाराजी असून निवडून येण्याची शक्यता नसल्यानेच हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यांऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. ऐनवेळी एबी फॉर्म बाबुराव कदम यांना देण्यात येणार असल्याचे समजते.