मनसेला आणखी एक धक्का; अटीतटीच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने मारली बाजी
By मुकेश चव्हाण | Published: February 9, 2021 09:17 PM2021-02-09T21:17:02+5:302021-02-09T21:17:11+5:30
कल्याण तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतमध्ये अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
डोंबिवली: गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर मनसेचेकल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केला होता. या दोन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने कल्याण-डोंबिवलीत मनसेत मोठं खिंडार पडलं आहे. त्यातच आता आणखी एक भर झाली आहे.
कल्याण तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतमध्ये अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या ग्रामपंचायतमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये सरपंच पदासाठी चुरस होती. शिवसेनेच्या वंदना ठोंबरे आणि मनसेच्या जयश्री ठोंबरे यांच्यात सरपंच पदासाठी चुरस रंगली होती.
सरपंच पदासाठी शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या वंदना ठोंबरे विजयी झाल्या. वंदना ठोंबरे यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी योगेश ठाकरे यांची निवड झाली. काल कोरम पूर्ण नसल्याने सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित झाली होती.
खोणी वडवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज शिवसेनेच्या सौ.वंदना ठोंबरे व उपसरपंचपदी श्री.योगेश ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तसेच उपस्थित सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सर्वांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/JvZqv6uS1M
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) February 9, 2021
कल्याण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीमध्ये 8 फेब्रुवारीची तारीख निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आली. कल्याण तालुक्यातील 11 पैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडली. 10 ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 2 आणि एक अपक्ष उमेदवार सरपंच पदी निवडून आले.
मात्र संवेदनशील मानली जाणाऱ्या खोणी ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले 11 सदस्य वेळेवर न पोहोचल्याने खोणीतील सरपंच पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. काल केवळ पाच सदस्य उपस्थित होते. कोरम पूर्ण नसल्याने विस्तार अधिकारी यांनी सोमवारची निवडणूक आज घेतली. आज पार पडलेल्या निवडणुकीत एकूण 9 सदस्य उपस्थित होते.