शिवसेनेला एकच मंत्रीपद, तेही अवजड; नाराजी असली तरी दाखवायची कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 02:52 AM2019-06-01T02:52:51+5:302019-06-01T02:53:10+5:30
शिवसेनेच्या एका नेत्याने बोलताना सांगितले की, आम्ही जर भाजपसोबत युती केली नसती तर महाराष्ट्रात त्यांच्या किती जागा आल्या असत्या? याचाही विचार त्यांचे नेते करत नाहीत
मुंबई : लोकसभेत भाजपसोबत युती करुन १८ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला केंद्रात मात्र एकाच मंत्रीपदावर समाधान मानावे लागले आहे. आधी दोन मंत्रिपदे देणार असे सांगूनही एकच मंत्रिपद; ते ही शोभेच्या खात्याचे मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. पण ही नाराजी सांगायची कोणाकडे, हा प्रश्न सेनेपुढे निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या एका नेत्याने बोलताना सांगितले की, आम्ही जर भाजपसोबत युती केली नसती तर महाराष्ट्रात त्यांच्या किती जागा आल्या असत्या? याचाही विचार त्यांचे नेते करत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी मन मोठे करुन युती केली, परिणामी राज्यात यश मिळाले. त्याची जाणीव भाजप ठेवेल असे वाटले होते पण तसे झाले नाही. याआधी हे खाते शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, सुरेश प्रभू यांच्याकडे होते तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हे खाते तीन वर्षे सांभाळले. काँग्रेसच्या सरकारमध्ये विलासराव देशमुख यांच्याकडे अवजड उद्योग खाते देण्यात आले होते. नंतर ते काही काळ प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्यात आले. पुढे युतीची सत्ता आल्यानंतर हे खाते अनंत गिते यांच्याकडे दिले गेले. मात्र यातल्या कोणालाही हे खाते राजकीय दृष्टीने लाभदायक ठरले नाही.
शिवसेनेची झालेली ही ‘अवजड’ अडचण आहे, कारण आता विधानसभा आम्ही एकत्र लढवणार असे जाहीर करुन बसलो आहोत. देशात एकट्या भाजपला स्पष्ट बहूमत आहे. त्यामुळे आम्ही विरोध केला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल व त्यात काही महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळतील, शिवाय निवडणुकीनंतर जर पुन्हा युतीची सत्ता आली तर ज्यांचे जास्त सदस्य त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा करार असल्यामुळे आत्ता फारशी नाराजी व्यक्त न करता, आहे तसे चालू द्यायचे असे धोरण शिवसेनेने स्वीकारल्याचे तो नेता म्हणाला.