Join us

‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा पण...; शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:06 AM

राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले होते.

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा आणि त्यानं काय करावं हे राहुल गांधी यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा अशा शब्दात  शिवसेनेने सामना संपादकीयमधून राहुल गांधींचं कौतुक करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले होते. कोरोनाविरुद्ध लढताना केवळ लॉकडाऊन पुरेसं नाही. वैद्यकीय चाचण्या वाढवल्या पाहिजेत. तसेच केंद्र सरकारनं अधिक अधिकार व आर्थिक ताकद द्यायला हवी, अशी अपेक्षाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. राहुल गांधींनी घेतलेल्या या भूमिकेचं शिवसेनेने स्वागत केले आहे. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. त्यामुळे सरकारनं त्यांच्या या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसचा पराभव होणार नाही. लॉकडाऊनमुळे वैद्यकीय सुविधा तयार करण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून त्यातून बाहेर पडण्याची रणनिती तयार व्हायला हवी, हे राहुल गांधी यांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे. फक्त घरी बसून हे संकट दूर होणार नाही, तर वाढणार आहे. केव्हा तरी घराबाहेर पडावेच लागेल. मात्र त्यावेळी काय याबाबतचा कोणताही ठोस कार्यक्रम आज तरी दिसत नाही असं देखील सामनाच्या अग्रलेखामधून सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी देश-विदेशातील डॉक्टर्स, तज्ञ यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी संवाद साधल्यावरच राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी हे जे सर्व मार्गदर्शन केले ते देशहिताचे आहे. सरकारकडून हे समोर येणे आवश्यक असते. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याराहुल गांधीशिवसेनाभारतसोनिया गांधीउद्धव ठाकरेमुंबई