प्रभाव लोकमतचा; शिवसेनेने घेतली कोळी महिलांच्या मशाली आंदोलनाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:28 PM2020-03-14T18:28:05+5:302020-03-14T18:57:43+5:30
- मनोहर कुंभेजकर मुंबई - "मशाली घेऊन कोळी महिलांचे आंदोलन" या मथळ्याखाली आजच्या लोकमतच्या अंकात आणि काल लोकमत ऑनलाईनच्या ...
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- "मशाली घेऊन कोळी महिलांचे आंदोलन" या मथळ्याखाली आजच्या लोकमतच्या अंकात आणि काल लोकमत ऑनलाईनच्या बातमीची दाखल शिवसेनेने घेतली आहे.
अंधेरी (पूर्व),मरोळ जे.बी.नगर मेट्रो स्टेशन जवळ पुरातन सुक्या मासळीच्या बाजारामध्ये नव्याने होत आहे. अनाधिकृत बांधकाम आक्रमक झालेल्या येथील मासळी बाजारात सुक्या मासळीची विक्री करणाऱ्या सुमारे 200 कोळी महिलांनी कोणाला सुगावा न लागू देता हातात हातोडा व मशाली घेऊन गेल्या गुरुवारी तोडून टाकले होते.
गेल्या शुक्रवारी दुपारी लोकमत ऑनलाईनवर बातमी प्रसिद्ध होताच पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेतली.त्यांनी येत्या सोमवार दि,16 रोजी दुपारी 2.30 वाजता पालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनात चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती मरोळ बाजार मासे विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांनी लोकमतच्या सदर प्रतिनिधीला दिली.काल लोकमत ऑनलाईनला आणि आज सदर वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ते सोशल मीडियावर व्हायरल होऊन त्याचे जोरदार पडसाद उमटले.कोळी महिलांच्या या गनिमी कावा आंदोलनाचे समाजबांधवांनी तर उस्फूर्त स्वागत केले असल्याची माहिती राजेश्री भानजी यांनी लोकमतला दिली.
शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी मरोळ बाजार प्रकरणी मी बैठक आयोजित केली असून लोकमतच्या माध्यमातून येथील कोळी महिलांची समस्यांचे गांभीर्य समजले. महापौरांना देखील येथील कोळी महिलांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
मोक्याच्या जागी असलेल्या या मासळी बाजारावर बिल्डरचा डोळा होता.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना येथील बाजारच्या जागी गगनचुंबी इमारत बांधणार असल्याची माहिती मिळताच 2000 साली त्यांनी माजी महापौर हरेश्वर पाटील यांना जातीने लक्ष घालण्याचे सांगितले. त्यानंतर याजागी इमले थांबवल्याचे फर्मान फसले आणि शिवसेनाप्रमुखांमुळे आमचा मरोळ बाजार वाचला आणि आजच्या घडीला या बाजाराची किंमत सुमारे 400 कोटीं असून येथे मासळी विक्री करणाऱ्या कोळी महिलांच्या जागरूकतेमुळे वाचला आहे, अशी माहिती राजेश्री भानजी यांनी लोकमतला दिली.
बाजाराच्या जागेत उभारली अनधिकृत बांधकामे पालिकेने तोडून टाकावीत आणि या मासळी बाजाराचा सातबारा कोळी महिलांच्या नावावर करावी अशी मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली.