मुंबई/वाशिम/नागपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या चार शिक्षण संस्था तसेच एका क्रेडिट साेसायटीवर तसेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा करणारा अधिकारी बजरंग खरमाटे याच्या कार्यालयावर छापासत्र राबवले. मात्र असे छापासत्र घडले नसल्याचा दावा नागपूर ग्रामीण परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. परब यांना ईडीने यापूर्वीच नोटीस जारी केली आहे.
यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या खासदार गवळी यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अलिकडेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता, तसेच त्याचे पुरावे ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांना पाठवल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे सत्ताधारी पक्षांनी म्हटले आहे.
रिसोडमध्ये दिवसभर तळ
साेमवारी सकाळी १० वाजता वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीच्या पाच अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. दि रिसोड अर्बन काे-ऑप. क्रेडिट साेसायटी लि. (रिसाेड), भावना पब्लिक स्कूल (देगाव), वैद्यकीय महाविद्यालय, जन शिक्षण संस्था तथा शिरपूर येथील एका शिक्षण संस्थेत जाऊन पथकाने चौकशी केली. या सर्व ठिकाणी केंद्रीय रिझर्व पोलीस दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत कार्यालयातील दस्तऐवज व आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली.
अनिल परब यांच्या जवळचे मानले जाणारे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप-परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयावरही ईडीने छापे टाकले. संबंधित अधिकाऱ्यांशी संबंध नसल्याचे परब यांच्या कार्यालयाने सांगितले.
सूडबुद्धीचे राजकारण
भाजप सूडबुद्धीचे राजकारण करत आहे. माझ्या शिक्षण संस्थांमध्ये सर्व गोरगरीब मुले शिक्षण घेत आहेत. या संस्थांत अपहार होण्याची शक्यताच नाही. अनेक वेळा मी विद्यार्थ्यांची फीसुद्धा माफ केली आहे. भाजपमधील काही आमदार या कटकारस्थानात समाविष्ट असून, त्यांचीसुद्धा ईडीने चौकशी केली पाहिजे. - खा. भावना गवळी
कंत्राटदाराच्या घराचीही झडती
पाथरी (जि. परभणी) येथील कंत्राटदार सईद खान ऊर्फ गब्बर यांच्या घराची सोमवारी ईडीच्या अधिकाऱ्यांची तीन तास झडती घेतली. खा. गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या कामांत सईद खान यांची भागीदारी असल्याची माहिती आहे. खान यांच्या घराच्या ५० मीटरपर्यंतचा परिसर सील केला. हे सर्व राजकीय सूडबुद्धीने घडत आहे. ज्या पद्धतीने भाजप मागणी करत आहेत व कारवाई होत आहे, ठरवून ही कारवाई सुरू आहे. - नवाब मलिक, राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते