चप्पल आणि बाप बदलणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत; शिवसेनेचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 10:10 AM2022-01-17T10:10:30+5:302022-01-17T10:11:58+5:30
सुरु असलेले प्रकल्प हे वेळेवर पूर्ण होतील तेव्हा उद्घाटनाला चप्पल बदलणाऱ्यांनी सल्ले देऊ नयेत वेळेवर हजर राहा, असा टोला शिवसेनेने लगावला.
ठाणे : दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे विकासासाठीचे योगदान सर्वश्रुत आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची चप्पल त्याच्या मुलाला घालायला दिली होती. पित्याची चप्पल पुत्राच्या पायात बसली नाही. उलट त्या चपलेचा अवमान करून दुसऱ्याची चप्पल डोक्यावर घेणाऱ्या या पुत्राला जनतेने दोन वेळा घरी बसविले, याचे भान ठेवण्याची गरज आहे, असे जोरदार प्रत्युत्तर शिवेसेनेने पत्रक काढून दिले.
पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे खोडून काढले होते. मात्र त्यानंतरही पक्षातर्फे पत्रक काढून परांजपे यांच्यावर हल्ला चढविण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासाचे बाळ (श्रीकांत शिंदे यांची कारकीर्द) सात वर्षांचे झाले. या काळात बाळाने विकासकामांचा डोंगर उभा केला. सुरु असलेले प्रकल्प हे वेळेवर पूर्ण होतील तेव्हा उद्घाटनाला चप्पल बदलणाऱ्यांनी सल्ले देऊ नयेत वेळेवर हजर राहा, असा टोला शिवसेनेने लगावला. राष्ट्रवादी वारंवार पत्रकार परिषदा घेऊन वादाची ठिणगी जर लावणार असेल तर आग भडकणारच. कलीयुगातील कालींना पुरण्यासाठी या नारदाची (महापौर म्हस्के यांची) गरज आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर शिवेसनेने आनंद यांना संधी दिली. शिवसैनिकांनी चप्पल झिजवून त्यांना खासदार केले. मात्र त्यांना झिजवलेल्या चपलांचा विसर पडला. वडिलांची चप्पल कशी टिकवावी, यांची अक्कल नसल्याने दुसऱ्या पक्षाची चप्पल आपल्या पायात घालण्याची आणि बाप बदलण्याची वेळ आनंद परांजपे यांच्यावर आली. त्यामुळे चपला आणि बाप याच्या उपमांच्या फंदात परांजपे यांनी पडू नये, असे उत्तर शिवसेनेने दिले.
...तर महाविकास आघाडी नको - म्हस्के
घरी बसलेल्या नेत्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी हे सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. परंतु, चिखलफेक अशीच सुरू राहिली तर ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल.
पण अशी महाविकास आघाडी नको, असल्याची वैयक्तिक भूमिका ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली.
परांजपे यांच्या टीकेनंतर म्हस्के यांच्यासह नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेंद्र जानकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.