Join us

शिंदे गटावर कारवाईसाठी हालचाली वाढल्या! शिवसेना नेत्यांची महाधिवक्त्यांसह विधिमंडळात खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:26 PM

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेने १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत थेट कायदाच दाखवला आहे. यानंतर आता शिवसेना नेत्यांनी थेट सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केले आहे. 

एकनाथ शिंदे गटाने थेट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव सादर केला आहे. त्यामुळे आता झिरवळ यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा किंवा कारवाई करण्याचा अधिकार राहात नाही, असा दावा करण्यात आला आहे. तर, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली. गटनेतेपदावरून त्यांची उचलबांगणी करून अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले. यावरही एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. 

१६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिसा बजावरणार?

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटिसा बजावल्या जाऊ शकतात. यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत करण्यात आले. यासंदर्भात कारवाई करायची असेल, तर त्याचे स्वरुप कसे असेल, यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास विधिमंडळात दाखल झाले होते. त्यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील प्रभू हेही विधिमंडळात हजर होते. तब्बल तीन ते चार तासांच्या चर्चेनंतर आता या १६ आमदारांना नोटिसा बजावण्यात येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात कायद्याची बाजू समजून घेण्यासाठी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. 

आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देणार?

शिवसेनेच्या या १६ आमदारांना नोटिसा बजावल्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. या आमदारांना एकतर विधिमंडळात येऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने आपले म्हणणे मांडायची संधी दिली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने एक पत्र नरहरी झिरवळ यांना देत पक्षाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी एकमताने निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे. या पत्रावर ३७ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

दरम्यान, शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या बंडखोर आमदारांमध्ये, एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, महेश शिंदे, अनिल बाबर, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी किणीकर, लता सोनावणे, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर, रमेश बोरनारे यांचा समावेश आहे.  

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदे