मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांचा पाठिंबा मिळवत उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत राज्यात सत्तांतर घडवून आणलं होतं. तेव्हापासून शिवेसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिंदे गटात दाखल होत आहेत. दरम्यान, आदिल्य ठाकरेंचा मतदार संघ असलेल्या वरळीमध्येही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वरळीतील युवासेनेचा खंदा पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाला आहे.
एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध भागातून पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा धडाका लावला असतानाच आता त्यांनी आपला मोर्चा आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीकडे वळवला आहे. वरळीतील युवासेना विभागीय चिटणीस साई किरण सेपुरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सेपुरी हे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे खंदे समर्थक मानले जायचे.
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी त्यांना साथ दिली होती. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी सुमारे ४० आमदार त्यांच्यासोबत गेले. तर १८ खासदारांपैकी १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तसेच अनेक महानगरपालिका, नगरपालिकांमधील नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला होता.