Join us  

Maharashtra Political Crisis: शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात! प्रतोद, गटनेतेपद रद्द ठरवल्याविरोधात याचिका  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 2:10 PM

Maharashtra Political Crisis: अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्याविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या काही दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. यातच आता शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची नियुक्ती विधानसभा अध्यक्षांनी रद्द ठरवत एकनाथ शिंदे आणि अजय गोगावले यांची निवड योग्य ठरवली आहे. 

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची नियुक्ती रद्द ठरवली. दरम्यान, विधानसभेच्या विशेष अधिवेशन सत्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेने व्हीप विरोधात ३९ आमदारांनी मतदान केले असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर आधीच्या पिठासीन अधिकाऱ्यांनी व्हीपच्या विरोधात ३९ मतदारांनी मतदान केल्याचे सभागृहात रेकॉर्डवर आणले होते. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर आसनावर आले. त्यावेळी त्यांच्यासमोर कुठलाही नवीन व्हीप नव्हता. मात्र, तरीही त्यांनी पुन्हा त्याच व्हीपच्या आधारे कारवाई करणे हे असंवैधानिक असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

शिवसेना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार

व्हीपच्या मुद्द्यावरून आता शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असून, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहे. अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेकडून अभिषेक मनु सिंघवी हेच युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्यावतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असे पत्र विधानमंडळ सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठविले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. पक्षाच्या १६ आमदारांनी आदेशाविरोधात मतदान केल्याचे पत्रात म्हटले आहे त्यामुळे शिवसेनेत व्हीप नक्की कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र विधिमंडळाने अजय चौधरी यांची गटनेते म्हणून मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेते म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवालयाने पाठवले आहे. तसेच भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळशिवसेनाउद्धव ठाकरे