भाजपच्या गांधीप्रेमाने शिवसेना अस्वस्थ,नामफलकावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:40 AM2022-01-29T11:40:02+5:302022-01-29T11:41:03+5:30

जांभोरी मैदानातील नामफलकावरून वाद : गांधीगिरीचा दिला इशारा

Shiv Sena is upset over BJP's love for Gandhi | भाजपच्या गांधीप्रेमाने शिवसेना अस्वस्थ,नामफलकावरून वाद

भाजपच्या गांधीप्रेमाने शिवसेना अस्वस्थ,नामफलकावरून वाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड मधील मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून शिवसेना - भाजपमध्ये वाद सुरू आहे. तर आता वरळी बी.डी.डी. चाळीतील जांभोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक गायब असल्याचे भाजपने निदर्शनास आणले आहे. सत्तेसाठी धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना महात्म्याचा विसर पडावा, हे दुर्दैवी असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शुक्रवारी स्थायी समितीमध्ये केली. मैदानात दहा दिवसामध्ये गांधीजींच्या नावाचा फलक न लावल्यास गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

या मैदानाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री व वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र नुतनीकरणानंतर मैदानातील कुठल्याही प्रवेशद्वारावर अथवा पर्यावरण मंत्री यांच्या ट्विटमध्ये महात्मा ‘गांधी मैदान’ असा उल्लेख नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. 
पर्यावरण मंत्री, महापौर, आयुक्त या ऐतिहासिक मैदानाचे नाव विसरले आहेत का? टिपू सुलतानच्या अनधिकृत नामफलकाला संरक्षण देणारे, आजही अनधिकृत नामफलक दिमाखात प्रवेशद्वारावर मिरवत ठेवणारे महापालिकेतील शिवसेनेचे धाबे दणाणले भाजपने कळीच्या मुद्यावरच बोट ठेवल्याने शिवसेनेचे धाबे दणाणले आहे. गांधी मैदानाचे लोकार्पण २४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. त्यामुळे आता नामफलकाबाबत मुद्दा उपस्थित केला जात असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबत प्रशासनाकडून माहिती मागवली आहे. त्या मैदानाचे नाव, त्याची देखरेख करणारी एजन्सी याची माहिती मागवून कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले. 

सत्ताधारी शिवसेनेचे नेते आता वरळीतील मैदानावर अधिकृत नामकरणाचा फलक ‘महात्मा गांधी मैदान’ असा लावतील का, असा प्रश्न गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 

गांधीजींचा पदस्पर्श
स्वातंत्र्य लढ्यामध्ये जांभोरी मैदानास राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पदस्पर्श झाला होता. स्वातंत्र्यानंतर या मैदानाचे नामकरण ‘महात्मा गांधी मैदान’ असे करण्यात आले. या मैदानाला ऐतिहासिक व पुरातन दर्जा प्राप्त असल्याने त्याचे नुकतेच सुशोभीकरण झाले.

 

Web Title: Shiv Sena is upset over BJP's love for Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.