Join us

“स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”; किशोरी पेडणेकरांना अश्रु अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 8:51 PM

संयमी आणि दिलदार नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे म्हणणे ऐका. ही बंडखोरी हाताळायला आदित्य ठाकरे सक्षम आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटल्या. यातच शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी यावर भाष्य केले. किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी किशोरी पेडणेकर यांना अश्रु अनावर झाले. एकनाथ शिंदे यांना परत या, अशी आर्त साद किशोरी पेडणेकर यांनी घातली.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत, याच्याशी आम्हाला घेणे-देणे नाही. एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले आहे, ते हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्षम आहेत. बाळासाहेब यांच्या स्मृतिस्थळासमोरील ज्योत नेहमी शांत आणि स्थिर असते. मात्र, आता ती हलायला लागली आहे. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांना वेदना होत आहेत. प्रत्येक सुमारे १० वर्षांनी आम्हा शिवसैनिकांना अशा घटनांन सामोरे जावे लागत आहे. या वेदना आम्हाला आत्मक्लेष देणाऱ्या आहेत. कोरोना संकटाच्या काळात ज्या मुख्यमंत्र्यांचे देशभरात कौतुक झाले. मात्र, बाळासाहेब असतानाही जे बाहेर गेले त्यांनी असेच आरोप केले, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

हा सगळा मेलोड्रामा आम्हा शिवसैनिकांना आत्मक्लेष देणारा

सोमवार रात्रीपासून हा सगळा जो काही मेलोड्रामा सुरू झाला आहे, तो आम्हा शिवसैनिकांना आत्मक्लेष देणारा आहे. मात्र, असे दिवस सारखे-सारखे दिसू नयेत, असे सांगताना किशोरी पेडणेकर यांना अश्रु अनावर झाले. एकनाथ शिंदे यांना सल्ला देण्याइतपत मी नक्कीच मोठी नाही. पण, एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विनंती करेन की, राज्यात भारतीय जनता पक्षाकडून जो काही गाजर दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याला बळी पडू नका. परत या, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले. 

हिंदुत्व हे दाखवणारे नसते, ते मानायचे असते

हिंदुत्व दाखवून किंवा मिरवून येणारे नाही. हिंदुत्व मानण्यावर आहे. दुसऱ्या धर्माला कमी लेखावे, असे बाळासाहेबांनी कधी केले नाही. तेच हिंदुत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. गेल्या चार महिन्यापासून हनुमान चालिसा, भोंगा प्रकरणावरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतातर आमच्या घरातूनच फुटण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला एकनाथ शिंदे यांनी यश देऊ नये. एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना समजावले

उद्धव ठाकरे अत्यंत संयमी, शांत, दिलदार नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर या मी करतो. परंतु, भाजपच्या गाजरांना बळी पडू नका. भाजपसोबत गेलात तर तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यात येणार नाही. मात्र, तुम्हाला चुकून मुख्यमंत्री केले, तर सर्वप्रथम अभिनंदन करत मी तुम्हाला हार घालेन, त्यामुळे याचा विचार करा. शिवसेनेला मोठे करण्यात आपले महत्त्वाचे योगदान आहे, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  

टॅग्स :एकनाथ शिंदेकिशोरी पेडणेकरबाळासाहेब ठाकरेशिवसेना