Kishori Pednekar: “तुम्ही तुमचं बघून घ्या ही राज ठाकरेंची भूमिका, पण मनसैनिक हुशार झालेत”; किशोरी पेडणेकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 03:21 PM2022-05-02T15:21:37+5:302022-05-02T15:22:24+5:30
Kishori Pednekar: मशिदींवरील भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेनंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून, मनसैनिक मशिदींसमोर हनुमान चालीस लावतील पण राज ठाकरे मात्र फिरायला जातील, असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगतील की, हनुमान चालीसा वाचा, मशिदींसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. मी जरा फिरून येतो. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावल्यानंतर काही भांडण आणि तंटे झाले तर तुम्ही तुमचे बघून घ्या, अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे, या शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला.
मनसैनिक आता हुशार झालेत
मशिदींवरील भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे. राज ठाकरे यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशामुळे तरुण मनसैनिक तुरुंगात जाऊन बसतील. तुम्ही तुमचे रेकॉर्ड बिघडवाल. मात्र, राज ठाकरे हे सगळे तुम्हीच भोगा, असे म्हणतील. पण मनसैनिकही हुशार झाले आहेत. हे सगळे खरे नाही. हे त्यांनाही माहिती आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, मुंबईकरांनी शांतता राखावी. नागरिकांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मुंबईत दंगली नकोत, ही ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे. एमआयएम पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत सबुरीची भूमिका घेतली आहे. भोंग्यांवरून वाद निर्माण झाल्यास डोके थंड ठेऊन काम करा, असे आदेश आम्हीदेखील शिवसैनिकांना दिले आहेत, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.