Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे म्हणणाऱ्या मनसेला किशोरी पेडणेकरांनी सुनावले; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 05:16 PM2022-08-27T17:16:53+5:302022-08-27T17:18:37+5:30
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देऊ. बेस्ट महापालिकेत विलीन करण्याचे आश्वासन दिले. त्यावर काहीच झालेले नाही, असे सांगत मनसेने शिवसेनेवर टीका केली.
Maharashtra Political Crisis: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत पडलेली उभी फूट उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठी डोकेदुखी ठरणार आहे. यातच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून मनसे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. बेस्टमधील कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून टीका करताना आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लाज वाटली पाहिजे, असा घणाघात मनसेने केला होता. याला आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बेस्ट आणि मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनलीय. बेस्टने ५ कंपन्यांना कंत्राटावर बसेस चालवण्याची कामे दिली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून कंत्राटी कामगारांना पगार दिला जात नाही. ३ महिन्यापूर्वी निवेदन देऊनही अद्याप बेस्टने न्याय दिला नाही. त्यामुळे आता मनसे युनियनच्या माध्यमातून बेस्टला ५ सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. कामगारांना पगार मिळाला नाही तर ६ तारखेला कुलाबा भवनमध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांना १ मिनिटही त्यांच्या केबिनमध्ये बसू देणार नाही. मनसे स्टाईलने आंदोलन होईल, त्याची जबाबदारी बेस्टची असेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
बेस्टच्या सनदी अधिकाऱ्यांकडे चौकशी करावी
बेस्टच्या कंत्राटी कामगारांना काही महिन्यांपासून पगार नाही. यासाठी आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, अशी टीका देशपांडे यांनी केली. याला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. संदीप देशपांडेंच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. “सौ चूहे खा के बिल्ली हज को चली” असे म्हणत पेडणेकर यांनी देशपांडेंना टोला लगावला आहे. गुजरातच्या कंपनीला दिलेल्या कंत्राटाबाबत बेस्टच्या सनदी अधिकाऱ्यांकडे चौकशी करावी, असा सल्ला पेडणेकर यांनी मनसेला दिला. तुम्हाला उठसूठ भ्रष्टाचारच दिसतोय, असेही पेडणेकर मनसेला संबोधून यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, ९० टक्के बस गेली ३ महिने बाहेर पडल्या नाहीत. मग बेस्टने यांच्यासोबत कंत्राट का केले? कंत्राट असेल बस चालवत का नाही? कामगारांचे पगार का दिले जात नाहीत? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला. त्याचसोबत नोकरी देताना बऱ्याच जणांकडून २० हजार रुपये घेतले होते. याबाबत वारंवार बेस्टकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. मग या कामगारांनी कुणाकडे आशेने पाहायचे? बेस्टचा मागील काळात मोठा संप झाला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देऊ, बेस्ट महापालिकेत विलीन करू असे आश्वासन दिले. परंतु त्यावर काहीच झाले नाही, असा टोलाही मनसेने शिवसेनेला लगावला.