Maharashtra Political Crisis: “उद्धवसाहेब आणि आदित्यजींच्या नेतृत्वात शिवसेना मजबूत करण्याचे काम महिला आघाडी करेल”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:46 PM2022-07-05T16:46:41+5:302022-07-05T16:48:08+5:30
Maharashtra Political Crisis: बंडखोर लोकांच्या समोर जाऊन शिवसेना वाढवू आणि त्यांना गाडू, असे आश्वासन महिला आघाडीने उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या अनेक दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोल करण्याचे काम शिवसेनेकडून सुरू झाले असून, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या महिला आघाडीची बैठक घेतली. यानंतर बोलताना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार महिला आघाडीने केला आहे, असे शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
सर्व महिलांनी ताकदीने बंडखोर लोकांच्या समोर जाऊन शिवसेना वाढवू तसेच बंडखोरांना गाडू, असा प्रण केला आहे. शिवसेनेसाठी या अशा घटना नवीन नाहीत. मात्र, शिवसेनेच्या नशिबी आलेली ही मोठी त्सुनामी आहे. थोडा वेळ जावा लागेल. तेवढा वेळ घेतला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे जाईल, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत
प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ जाऊ द्यावा लागतो. मात्र, तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे सांगताना ५० टक्के महिलांसाठी आरक्षण महापालिकेत आले, तेव्हा राज्यात आणि देशातही महिलांना ५० टक्के आरक्षण द्या, असा प्रस्ताव दिला होता. ते बिल केंद्रात पडून आले. मात्र, पुरुष प्रधान देशात महिलांना संधी मिळत नाहीत. परंतु, शिवसेना ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात महिलांना संधी देईल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.