Join us

आनंदाचा शिधा उपलब्ध नसल्याने विलेपार्ले रेशनिंग ऑफिसला शिवसेनेने घातला घेराव

By मनोहर कुंभेजकर | Published: September 18, 2023 7:01 PM

सरकारच्या या भोंगळ कारभाराचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे.

मुंबईआनंदाचा शिधा गणेश चतुर्थी निमित्त  100 रुपयात आनंदाचा शिधा रेशन दुकानावर देण्यात येईल अशी घोषणा सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आली होती. मात्र अंधेरी व विलेपार्ल्यात बऱ्याच रेशनिंग दुकानावर दुकानावर चणाडाळ १ किलो, रवा, १ किलो साखर,१ किलो खाद्यतेल हा आनंदाचा शिधा उद्या गणेश चतुर्थी असतांना अजून रेशनिंग दुकानावर पोहोचला नाही.

सरकारच्या या भोंगळ कार भाराचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. त्यामुळे विलेपार्ले पश्चिम बँक ऑफ बडोदा च्या वरती मिठीबाई कॉलेज समोरील रेशनिंग ऑफिसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने  आज दुपारी घेराव घालण्यात आला.अंधेरी व विलेपार्ल्यात रेशनिंग दुकानावर का अजून पोहोचला नाही? इतर अधिकारी गावी गेल्याने शिवसेनेच्या वतीने संबंधित प्रभारी अधिकारी समीर नाईक यांना जाब विचारण्यात आला.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे अधिकारी वर्गाने आश्वासन दिले की,आज संध्याकाळपर्यंत सर्व दुकानावर आनंदाचा शिधा पोहोचेल अशी माहिती विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे नितीन डिचोलकर यांनी दिली. आनंदाचा शिधा ही तर सरकारची फसवी योजना आहे. शिवसेनेच्या वतीने दि,16 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विलेपार्ल्यातील 11 रेशनिंग दुकानावर धडक देऊन योजनेची पोलखोल केली होती आणि जर आनंदाचा शिधा लवकर उपलब्ध झाला नाही तर घेराव घालण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला होता.आज अजून तो उपलब्ध झाला नसल्याने सदर घेराव आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती डिचोलकर यांनी दिली.

विभागप्रमुख आमदार अँड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या घेराव आंदोलनात अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम, समन्वयक नितीन डिचोलकर,समन्वयक सुनील खाबिया,उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, संजय पवार ,चंद्रकांत पवार, अनिल मालप,संजय जाधव, अनिता बागवे शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :मुंबई