Join us

... म्हणून राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला; शिवसेनेनं डिवचलं

By मुकेश चव्हाण | Published: October 30, 2020 4:18 PM

राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती. मात्र राज्यपालांनी याबाबत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. राज्यपालांच्या या भूमिकेवरुन शिवसेनेनं राज ठाकरे यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असावी. त्यामुळे राज्यपाल यांनी त्यांना शरद पवारांना भेटण्यासाठी सांगितले. तसेच शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असं मिश्कील प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 

तत्पूर्वी, सरकारमधे शरद पवारांचं ऐकलं जातं. त्यामुळे आपणही शरद पवारांशी एकदा बोला. मी सरकारला पत्र पाठवेन, पण त्यावर सरकार काही करेल का, याबद्दल मला शंका आहे. म्हणून आपण शरद पवारांशी बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तरीही मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलेन आणि जे काही करता येईल ते निश्चित करेन'', असं राज्यपालांनी राज ठाकरेंना सांगितलं होतं.

राज ठाकरेंनी राज्यपालांचा सल्ला ऐकला, शरद पवारांना फोन केला-

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती दिली आहे. मला राज ठाकरे यांचा फोन आला. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरेंनी चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंसोबत भेटण्याबाबत अजून काही ठरलं नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी सांगितले. 

राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?- राज्यपाल

राज्यपाल आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान काही किस्सेही घडल्याची माहिती समोर आली. राज ठाकरे राजभवनात दाखल होताच १ वर्षापासून मी तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्राच्या 'राज'चे आज दर्शन झाले, असं राज्यपाल म्हणाले. तसेच राज आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?, असा सवाल राज्यपाल यांनी राज ठाकरेंना केला. राज्यपालांच्या या प्रश्नावर 'मै हिंदी पिक्चर बहुत देखता हूँ इसिलिये', असं मजेशीर उत्तर राज ठाकरेंनी राज्यपालांना दिलं.

टॅग्स :राज ठाकरेमनसेअब्दुल सत्तारशिवसेनामहाराष्ट्र सरकारभगत सिंह कोश्यारीशरद पवार