Join us

राज्यपालांच्या वक्तव्याची निंदा करावी तितकी कमीच; जाहीर माफी मागा- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 1:15 PM

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे.

मुंबई- मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात सध्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि विकासात वाढ नाही तर वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यपाल महोदयांचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहेच, त्याचसोबत ह्या मातीत जन्मलेल्या अनेक थोर व्यक्तींच्या योगदान आणि बलिदानाचा देखील अनादर आहे. या वक्तव्याची निंदा करावी तितकी कमीच... महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमिकेसाठी त्यांनी जाहीर माफी मागावी, असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. 

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी भगतसिंग कोश्यारींची बाजू घेतली आहे. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही असं म्हटलं आहे. तसेच "...तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?" असा सवाल देखील विचारला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एवढेच कशाला... तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदीकडे देऊन ठेवली आहे ते चालत का? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही??" असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

राज ठाकरेंचा इशारा-

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत इशाराही दिला आहे. ‘आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो,’ असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे

काय म्हणाले होते राज्यपाल?

“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

टॅग्स :आदित्य ठाकरेभगत सिंह कोश्यारीशिवसेना