'राज्यात सर्कस सुरु झालंय, गद्दार हा गद्दारच असतो'; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:43 PM2022-07-19T20:43:37+5:302022-07-19T20:46:11+5:30
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर टीका केली आहे.
मुंबई- राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.
जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. जनतेच्या मनातलं सरकार आम्ही राज्यात स्थापन केलं आहे आणि याचं स्वागत या १२ खासदारांनीही केलं आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी इथं आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचं स्वागतही करण्यासाठी इथं आलो आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण..."; राहुल शेवाळेंनी युतीचा अणुबॉम्बच फोडला!
खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सर्कस सुरु झालं आहे. गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच राजीनामा देण्याची हिंमत असेल तर द्या आणि पुन्हा निवडून या, असं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी यावेळी बंडखोरांना दिलं आहे.
उद्धव ठाकरेंनी युतीचे प्रयत्न करायला सांगितले- खासदार राहुल शेवाळे
उद्धव ठाकरेंनाही भाजपासोबत युती हवी होती. त्यांनी तसं आम्हाला बैठकीत बोलून दाखवलं होतं. मी माझ्यापरीनं युतीसाठी प्रयत्न केले आहेत. आता तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करा असं आम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतला आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.