Join us  

'पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल'; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 3:55 PM

शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे.

मुंबई- शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे.

आदित्य ठाकरे या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध शिवसैनिकांसोबत भेटीगाठी घेत संवाद साधत आहे. या यात्रेदरम्यान आज आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत. ते लवकरच समोर येईल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 

काही बंडखोर आमदारांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहोत. मात्र काही आमदारांना जबरदस्ती नेलं आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे. 

दरम्यान, बंडखोरांना मात देण्यासाठी शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला असून यासाठी आदित्य ठाकरे मुंबईतील तब्बल २३६ शाखांमध्ये आणि बंडखोर आमदारांच्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. 

टॅग्स :आदित्य ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे