मुंबई-
दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी दहीहंडी फोडली आणि सर्वांच्या आशीर्वादानं हे सरकार अस्तित्वात आलं, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी कार्यक्रमात वक्तव्य केलं. त्यावर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. "तुम्ही ५० थर लावले की त्यांचा थरकाप झालाय हे सर्वांना माहित आहे. किमान आजच्या सणाच्या दिवशी तरी राजकारण नको", असं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना भवन परिसरात शिवसेनेच्यावतीनं निष्ठा हंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
"कुणी किती थर लावले यात मला पडायचं नाही. ५० थर लावले की थरकाप उडालाय हे सर्वांना माहित आहे. किमान आजच्या दिवशी तरी सणात राजकारण नको. कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची काही गरज नसते. २४ तास राजकारण करत राहिलं तर सणांचं महत्व तरी काय? त्यामुळे मला त्यात पडायचं नाही", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आज आनंदाचा दिवस, उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका; आदित्य ठाकरेंचा इशारा
ठाण्यातील टेंभी नाका येथे पूर्वापार चालत आलेल्या दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या दहीहंडी उत्सवाला आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित गोविंदांना संबोधित करताना शिंदेंनी राज्याच्या राजकारणात दीड महिन्यापूर्वी घडलेल्या राजकीय नाट्याचाही उल्लेख केला. दीड महिन्यापूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली आणि ५० थर लावले, असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी जशास तसं उत्तर दिलं.
"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा
शिवसेनेकडून उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. तसंच उद्धव ठाकरेंचं सरकार हे हिंदुत्वविरोधी होतं अशीही टीका करण्यात आलीय असं आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली. "आजचा दिवस सणाचा दिवस आहे. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज वाटत नाही. ठिक आहे आम्ही हिंदुत्वविरोधी असू तुमचं धर्मावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही सणात राजकारण आणणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्यात. आज सण आहे तो सणासारखा साजरा होऊ देत", असं आदित्य ठाकरे म्हणाले.