Video: 'माझं तुमच्यावर प्रेम होतं'; बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटताच आदित्य ठाकरे झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:18 PM2022-07-04T14:18:49+5:302022-07-04T14:19:02+5:30
आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे समोर आले.
मुंबई- विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शाह फारूख अन्वर मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली.
शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे समोर आले. यावेळी दोघांची भेट झाली. त्यानंतर प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे यांचा विधानभवनाबाहेर संवाद झाला. माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे, असं आदित्य ठाकरे प्रकाश सुर्वेना म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे हे प्रकाश सुर्वेंशी संवाद साधताना भावूक झाल्याचे दिसून आले.
मुंबई- शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा विधानभवनाबाहेर संवाद झाला. त्यावेळी आदित्य ठाकरे भावूक झाल्याचे दिसून आले. pic.twitter.com/0bmMiFA5xo
— Lokmat (@lokmat) July 4, 2022
शिवसेना संपतेय हे दिसत असल्यानंच हे पाऊल उचललं. आम्ही बंड केलेलं नाही उठाव केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष एक नंबरला होता. आता दोन वर्षात आम्ही चार नंबरला गेलो, असं शिंदे गटातील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील म्हणाले. बाळासाहेब आमच्या हृदयात होते, आहेत आणि राहतील, असंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्या पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने मी उभा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांची कारकीर्द यशस्वी होईलच, पण ती अधिक यशस्वी कशी होईल हा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्यात माझ्यात कधीही दुरावा, पॉवर स्ट्रगल, कुरघोडीचं राजकारण दिसणार नाही. कारण कधी आम्ही सोबत होतो, कधी वेगळ्या बाकांवर होतो आमच्यातली मैत्री कायम राहिली, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.