मुंबई: मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालून केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका घेतल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या कार्यालयाबाहेर बॅनरवर तसेच सोशल मीडियावरही अनेक पोस्टमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा करण्यात येत आहे. यावर मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर अमृता फडणवीस म्हणतात...
अनिल परब म्हणाले की, नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही आणि हिंदूंची मत देखील मिळत नाही असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंसाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मनसेने याआधीचा झेंडा विविध धर्मियांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचं काय झालं असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; अन्यथा... मनसेचा थेट इशारा
शिवसेना आणि मनसेमध्ये आता राजकीय वातावरण आणखी तापेल, असं बोललं जात असताना मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे या प्रकारचे बॅनर लावल्याने शिवसेना विरुद्ध मनसे असा थेट सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे.
मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणात मराठीचा मुद्दा आहेच, असे ठणकावले. तसेच, माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन'' असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठीवेळी मराठी अन् हिंदूवेळी मी हिंदू असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.