मुंबई: एकीकडे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीची राजकीय रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) तब्बल ११ तास कसून चौकशी करण्यात आली. ईडीच्या चौकशीनंतर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याची माहिती दिली.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अस्थिर झालेल्या शिवसेनेच्या अडचणीत यामुळे अधिक वाढ होत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. काही दिवसांपूर्वी बजावलेल्या समन्सवेळी अनिल परब चौकशीला उपस्थित राहिले नव्हते. मात्र, पुन्हा एकदा ईडीकडून समन्स आल्यानंतर अनिल परब यांनी चौकशीला हजेरी लावली. मंगळवारी अनिल परब यांची ईडीकडून तब्बल ११ तास चौकशी करण्यात आली. रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले. ईडीला आणखी काही माहिती आवश्यक असल्यास आपण ती देऊ असेही ते म्हणाले. तसेच बुधवारी पुन्हा एकदा अनिल परब यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.