Maharashtra Politics: दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे आता शेवटचा पर्याय काय? अनिल परबांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:16 PM2022-09-22T16:16:41+5:302022-09-22T16:17:40+5:30
दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाले नाही तर शिवसेना रस्त्यावरची लढाई लढणार का, यावरही अनिल परब यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज अमान्य केला आहे. यानंतर आता शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यावर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय, या प्रश्नावर अनिल परब यांनी सूचक विधान केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना, शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा ठाम निर्धार व्यक्त केला होता. मात्र, यानंतर महापालिकेने शिंदे गट असो वा शिवसेना या दोघांनी केलेला अर्ज मान्य होणार नसल्याबाबत अहवाल दिला. यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढची रणनीति ठरवू
दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल? आगामी काळात आंदोलने, निदर्शने यांच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढवली जाणार का? यावर बोलताना, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालय काय निर्णय देतेय, यानंतर आम्ही आमची रणनीति ठरवू, असे अनिल परब म्हणाले. तसेच पालिकेने दोन्ही गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. कदाचित पोलिसांनी पालिकेला याबाबत अहवाल दिला असेल. या अहवालाच्या आधारावरच पालिकेने तसे पत्र दिले असेल. या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. या सर्वाचीच न्यायालयात चर्चा होईल. न्यायालय निकाल काय देणार हे पाहिले जाईल. त्यानंर रस्त्यावरची लढाई लढायची की नाही ते ठरवले जाईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेला दसरा मेळाव्यावरून टोला लगावला आहे. कोणी मैदान देता का मैदान ...! शिल्लक सेनेला शिवतीर्थावर "टोमणे मेळावा" घेण्यासाठी मैदान नाकारले ... शिल्लक सेनाप्रमुख यांना आता फक्त फेसबुकवरच मेळावा घेण्याचा पर्याय उपलब्ध ..., असे खोचक ट्विट गजानन काळे यांनी केले आहे.