रत्नागिरी- सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे.
राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच जामीनासाठी अर्ज केला. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं २९ एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
राणा दाम्पत्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी देखील टीका केली आहे. शिवसेनेची काळजी नवनीत राणा यांनी करू नये, तुम्ही भाजप समर्थक, तुम्हाला बाळासाहेबांच्या भावना कळणार नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच दोघांनी हनुमान चालीसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर वाचावी, असंही भास्कर जाधवांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी कलम १५३ (अ) अंतर्गत काल अटक करण्यात आली. आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं. राणा यांना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली.
राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी तातडीनं जामीनासाठी अर्ज केला. मात्र जामीन अर्जावर त्वरित सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. न्यायालयानं दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या जामीनावर २९ एप्रिलला सुनावणी होईल. मात्र राणा दाम्पत्याकडे वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट गरजेची- केंद्रीय मंत्री नारायण राणे
राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल, तर विरोध का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे.