"आमची मंदिरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ; तुम्ही मंदिराला हात तर लावून दाखवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:26 PM2020-09-01T14:26:40+5:302020-09-01T17:03:35+5:30
इम्तियाज जलील यांच्या या विधानावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आव्हान दिले आहे.
मुंबई/ औरंगाबाद: अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी न दिल्याने एमआयएम आक्रमक झाली आहे. कोरोनाचा संसर्ग मंदिर किंवा मशिदीतून होणार नाही तरी आतापर्यंत धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज (१ सप्टेंबर) रोजी मंदिर उघडण्यासाठी औरंगाबादमधील मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदन देऊन विनंती करणार आहे. तर २ सप्टेंबर रोजी आपण स्वत: मशीद उघडणार आहोत, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. इम्तियाज जलील यांच्या या विधानावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आव्हान दिले आहे.
'शिवबंधन' सोडून शिवसैनिक झाले 'महाराष्ट्र सैनिक; राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमची मंदीर उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मंदीर उघडावी अशी आमची देखील इच्छा आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५- ६ दिवसांनंतर मंदीरांबाबत निर्णय जाहीर करणारच आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी राजकारण करु नये. त्यांना आम्ही मंदीर उघडू देणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगतिले. तसेच तुम्ही मंदीराला हात तर लावून दाखवा, मग आम्ही देखील उत्तर देऊ, असा इशारा देखील चंदकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना दिला.
"काय चाललंय; इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं"
महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. दैनंदिन जीवनाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर येईल असे वाटले होते. मात्र राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे यातील कोणतीही गोष्ट राज्य शासनाला करता आली नाही. लग्नासाठी पूर्वी ५० जणांना परवानगी देण्यात येत होती, आता ती २०० पर्यंत वाढविण्यात आली. एसटी बस सुरू करण्यात आली. असे असताना कोरोना आजार फक्त मंदिर आणि मशिदीमधून वाढणार आहे का? याचे उत्तर राज्य शासनाने द्यावे, असे इम्तियाज जलील म्हणाले.
१ सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. हिंदू बांधवांनी स्वत: आपली धार्मिक स्थळे सुरू करावीत, असे आवाहन मी करीत आहे. २ सप्टेंबरला मी स्वत: शहरातील शाहगंज येथील मशीद उघडणार आहे. शासनाच्या विरोधात जाऊन आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे. कारण आमचा नाईलाज आहे, असेही इम्तियाज जलील म्हणाले. मंदिर किंवा मशीद उघडण्यासाठी राज्य शासनाने नियमावली ठरवून द्यावी. एकाच वेळी ५० किंवा १०० जणांना प्रवेश देण्यात येईल, असे काहीतरी निश्चित केले पाहिजे, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.