शिवसेना देणार भाजपला धक्का? 20 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा; सेना नेत्याचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:36 AM2021-10-19T07:36:16+5:302021-10-19T07:41:13+5:30
हा तर शिवसेनेचा फुसका बार - भाजपचा पलटवार
मुंबई : आगामी निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच महापालिकेमध्ये राजकीय आखाडे रंगू लागले आहेत. भाजपचे १५ ते २० नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करीत शिवसेनेने खळबळ उडवून दिली आहे. डिसेंबर महिन्यात याबाबत घोषणा होईल, असे संकेत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत. तर हा नुसताच फुसका बार असल्याचा दावा भाजपने केला आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे आतापासून महापालिकेत वाहू लागले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत मागील काही महिन्यांपासून शिवसेनेविरोधात मोहीम उघडली आहे. यामुळे दररोज उभय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विविध विकासकामांमध्ये सत्ताधारी घोटाळा करीत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मात्र भाजपच्या नेतृत्वावर अनेक नगरसेवक नाराज असल्याने यापैकी सध्या १५ ते २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करीत जाधव यांनी सोमवारी जोरदार धक्का दिला.
‘उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा’
असे फुसके बार सोडण्याची शिवसेनेची जुनी सवय आहे, असा टोला भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे. हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे भाजपचा एकही नगरसेवक ढुंकूनही पाहणार नाही. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. गेली २५ वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेसाठीदेखील उमेदवार दिलेले आहेत. स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे ते भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.