मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिलेला इशारा यावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा अद्याप थंड होण्याचं नाव घेत नाही. मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक फोटो शेअर करण्यात आला. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीत ट्विटरवॉर सुरु आहे.
मनसेने शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक फोटो शेअर केल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही शरद पवार आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा फोटो पोस्ट केला. तसेच राज ठाकरे आणि शरद पवारांचा फोटोही राष्ट्रवादीचे नेत अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर शेअर करत काही फोटो चांगले असल्याचं म्हटलं.
मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपली असताना आता शिवसेनेनेही आता उडी घेतली आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत मनसेला डिवचलं आहे. त्यांनी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो ट्विट करत शरद पवारांवर बोलणाऱ्यांना आता कसं वाटतंय?, काही सूत्र जुळतात का?, असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेलं ट्विट चांगलचं चर्चेत आलं आहे. राज ठाकरे राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय, हे कसं कळत नसेल?, असं रोहित पवार म्हणाले. तसेच बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं, असं म्हणत आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा.... तर शरद पवार हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.