मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आपण पक्ष संघटनेवर भर देणार असून, शिवसैनिकांना भेटणार असल्याचे सांगितले. यानंतर आता शिवसेनेत संघर्ष सुरू असून, शिवसैनिकांनी शाखा आणि विभागावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन नेत्यांकडून केले जात आहे.
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसैनिकांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले असून, ते ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये, आदरणीय शिवसैनिक, जेव्हा जेव्हा आपला महाराष्ट्र संकटात पडला, शिवसेनेचा शिवसैनिक त्या संकटाला नडला. आज शिवसेना संकटातून संघर्ष करतेय, पक्षश्रेष्ठी व शिवसेनेचे नेते यांच्यात कायदेशीर लढा सुरू आहे. आपणा सगळ्यांना विनंती आहे की, या सर्व संकटातून शिवसेना मार्ग काढेल. परंतु, शिवसैनिकांनी त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपली शिवसेना आपल्या विभागासाठी, प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळकट करा, पुणे असो वा ठाणे, मुंबई असो या नवी मुंबई संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिला पाहिजे. वरिष्ठ पातळीवरच्या राजकारणास दुर्लक्ष करून शिवसैनिकांनी आपल्या शाखा आणि विभागात जनतेच्या सेवेसाठी उतरावे. जय महाराष्ट्र! असे पत्र दीपाली सय्यद यांनी लिहिले आहे.
शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदारांचा वेगळा विचार
एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. शिवसेनेच्या इतिहासातील आजवरचे हे सर्वात मोठं बंड मानले जात आहे. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटाने शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली. शिवसेना खासदारांच्या बैठकीत तीन खासदार अनुपस्थित होते. यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे लोकसभेत एकूण १९ तर राज्यसभेत तीन खासदार आहेत.