Join us

'दोन्ही बाजू गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?'; दीपाली सय्यद यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:23 PM

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील सध्याच्या राजकीय भूकंपावर ट्विट केलं आहे.

मुंबई- 'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा...' असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बुधवारी रात्री 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे जाताना उद्धव ठाकरे असं बोलले आणि निघून गेले. उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे  शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळत आहे. 

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील सध्याच्या राजकीय भूकंपावर ट्विट केलं आहे. एकनाथ शिंदे मला शिवसेनेत घेऊन आले. उद्धव ठाकरेंनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, असं म्हणत विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्वीकार करू, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.

मी पद सोडण्यास तयार- उद्धव ठाकरे

ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनादीपाली सय्यद