योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं; फडणवीस सोडणार आहेत का?, दीपाली सय्यद यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 01:01 PM2022-04-30T13:01:38+5:302022-04-30T13:08:46+5:30
अमृता फडणवीसांच्या 'योगी-भोगी' ट्वीटनंतर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला आता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने घेतलेल्या एका निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नव्याने तोंड फुटलं आहे. सध्या याच निर्णय़ावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत, असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोलाही लगावला होता. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी, असं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.
राज ठाकरेंच्या टीकेचा आधार घेत विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. अमृता फडणवीसांच्या या टीकेनंतर आता शिवसेनेनेही प्रत्युत्तर दिलं आहे.
अमृता फडणवीसांच्या 'योगी-भोगी' ट्वीटनंतर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं, फडणवीस बायकोला सोडणार आहेत का?, असा सवाल उपस्थित करत दिपाली सय्यद यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया-
सुप्रिया सुळेंना अमृता यांच्या याच टिकेसंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन थेट मुख्यमंत्र्यांना इशारा केलाय. “ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से,” असं अमृता म्हणाल्या असल्याचं पत्रकारांनी सुप्रिया यांना सांगितलं अन् यावर त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणावर बोलताना सुप्रिया यांनी, “मी तुम्हाला खरं सांगू मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मी मगाशी सांगितलं तसं मला इतकी कामं असतात की मला नाही माझ्या जबाबदाऱ्यांमधून बाकी काही करायला फारसा वेळ मिळतं,” असं उत्तर दिलं.