मुंबई - राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या निवडणुकीत संख्याबळ नसताना भाजपाने पाचवा उमेदवार उभा करून जिंकून आणला. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसची मते फुटली. निकालानंतर भाजपाचा जल्लोष सुरू होता. सर्वकाही ठीक असताना अचानक मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही संपर्कात नाही. त्यानंतर हे सर्व गुजरातच्या सूरत येथे असल्याचं समोर आले.
सूरतमधील हॉटेल मेरिडियनमध्ये भाजपा आमदार संजय कुटे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपामध्ये जाणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अहमदाबादला बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Eknath Shinde: ...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा!
सूरतमध्ये असणाऱ्या एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना गांधीनगरच्या एका फार्म हाऊसवर ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी नेण्यासाठी चार्टर फ्लाईट्स देखील तयार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेकडून रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी सूरतला रवाना झाले आहे.
शिवसेनेतील या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला असून आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवलं आहे. तर, शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं ट्विट-
''आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही'', असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केलं आहे.