'आमचं उष्ट कोणी खाऊ नये'; गुलाबराव पाटलांचा मनसेवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 02:48 PM2020-02-13T14:48:20+5:302020-02-13T15:19:10+5:30
राज ठाकरे औरंगाबादच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहे.
मनसेप्रमुखराज ठाकरे आजपासून चार दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये राज ठाकरेच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहे. मनसेने या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा तापणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र मनसेच्या या भूमिकेवरुन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचं नावाचा उल्लेख संभाजीनगर असा करत असेल तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात प्रथम हा मुद्दा मांडला होता. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक तेव्हापासून औरंगबादचा उल्लेख संभाजीनगर करत असल्यामुळे आमचं उष्ट कोणी खाऊ नये अशी टीका गुलाबराव पाटील यांनी मनसेवर केली आहे.
शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यातही होता. मात्र असे असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले होते.
राज ठाकरे औरंगाबादच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते शहरात हिंदुत्ववादी संघटना, एनजीओ आणि पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आगामी नियोजनाबाबत मंथन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.