Join us

"बाळासाहेबही म्हणाले असतील...शाब्बास संजय"; केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 12:52 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचे नेते केदार दिघे यांनी ट्विट केलं आहे.

मुंबई/ठाणे- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी ईडीचे १० अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी पोहचले. यावेळी CISF जवानही सुरक्षेसाठी तैनात होते. सकाळी ७ वाजल्यापासून राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. त्यानंतर दुपारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं गेले. सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता संजय राऊतांना ईडीने अटक केली. 

संजय राऊतांना अटक का केली?; आता ईडीनेच सांगितली यामागील ३ महत्वाची कारणं..!

संजय राऊतांना अटक केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. याचदरम्यान आता धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबही म्हणाले असतील..शाब्बास संजय, असं केदार दिघे ट्विटरद्वारे म्हणाले.

ना डर, ना सत्तेचा लोभ, ना मला वाचवाची भीक मागितली...तो योद्धा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी...! दिल्लीसमोर झुकणार नाही! जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत, असं केदार दिघे यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयशिवसेना