मुंबई- 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण' त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ. सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ मिळतो, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीका केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जोरात साजरी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. पण राज ठाकरे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गेले नाहीत. यावरून किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे.
नालेसफाईवरून भाजप करत असलेल्या टीकेला देखील किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांकडे दुसरं शास्त्रच नाही. टीका करणं हेच त्यांचे शास्त्र आहे. त्यांना टीका करत राहूदे स्वतः मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे व आघाडीचे आमदार हे सर्वजण मुंबईत पाणी तुंबणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
नालेसफाई प्रत्येक ६ महिन्यानंतर केली जाते. आयुक्तांनी या संदर्भात भरारी पथक देखील नेमले आहे. स्वतः आयुक्त चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही आणि तुंबले तर जास्त वेळ राहणार नसल्याचं म्हणत त्यांनी त्यांच्यावर सातत्याने विरोधक नालेसफाईवरून करत असलेल्या टीकेला किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं आहे.