मुंबई- पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्यानं प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मूळ समस्येकडेपण लक्ष दिले पाहिजे, असं पत्र भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
नितेश राणे पत्रात म्हणाले की, तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याची ठिकाणे आहेत. ज्याला आपण फ्लडिंग पॉईंटस म्हणतो. यापैकी २८ ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील २५ फ्लडिंग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
नितेश राणेंच्या या पत्रावरुन शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारणातली फारशी समज नितेश राणेंनी नाही. राजकारणात अपरिपवक्तत वाढत चाललीये. महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री यांना थेट तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा आयुक्तांना प्रश्न विचारा, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पब्लिसिटी करून घेताय, आयुक्तांना मर्जीत ठेवायचं, काम करून घ्यायचं आणि यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचं. प्रत्येकला टीआरपी हवं आहे, असंही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्सजवळ पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत?, हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?", असा टोला राणेंनी लगावला.
मुंबईतील एकूण ३६ टक्के नालेसफाई पूर्ण-
पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईतील नालेसफाईचं काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. मुंबई शहरातील नालेसफाई १८ टक्के झाली आहे. तर पूर्व उपनगरात ४४ टक्के आणि पश्चिम उपनगरात ३६ टक्के नालेसफाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईची यंदाही तुंबापुरी होणार का? असा सवाल विचारला जात आहे.