Join us  

'घर फिरलं की घराचे वासे फिरतात'; शिंदे, फडणवीस अन् ठाकरेंच्या भेटीवर पेडणेकरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 5:22 PM

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- गेले काही दिवस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलेली असतानाच राज यांच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील १० वर्षांपासून शिवाजी पार्कवर रोषणाई होते, त्यात काहीही नवे नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच मी नेहमीच म्हणते की घर फिरलं की घराचे वासे फिरतात. इथे मात्र वासे अगोदर फिरले आहेत. आता घर फिरवत आहेत, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

मनसेच्या दीपोत्सवाला यापूर्वीही या हजर राहण्याची इच्छा होती; पण येता आले नाही असे म्हणत शिंदे यांनी त्यासाठी योगायोग लागतो, तो आज आला, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची प्रशंसा केली. यावर देखील किशोरी पेडणेकरांनी भाष्य केलं. दहा वर्षांमध्ये यायला भेटले नाही, हे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र मागील दहा वर्षात नेमके काय मिळवले, हे त्यांनी सांगितले नाही. मतदारांना हे किती पटत आहे, हे दिसत आहे, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

शिवतीर्थ बंगल्यावर १० मिनिटे चर्चा-

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस हे आधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले, काही मिनिटांत मुख्यमंत्रीही गेले. त्यानंतर तिघांची दहा मिनिटे चर्चा झाली आणि नंतर तिघे शिवाजी पार्कवर गेले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिदे यांनी शिवाजी पार्कवर असलेल्या दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

टॅग्स :एकनाथ शिंदेराज ठाकरेदेवेंद्र फडणवीस