मुंबई- मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करु, वेळ असल्यास मुख्यमंत्र्यांनीही आम्हला मोठ्या मनाने साथ द्यावी, असं आवाहन अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं आहे.
आमदार रवी राणा २३ एप्रिलला 'मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्यांच्यासोबात ६०० हून अधिक कार्यकर्ते हे मातोश्रीसमोर जमणार आहेत. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण केलं नाही तर आपण मातोश्रीसमोर जाऊन पठण करु असं आव्हान, रवी राणा यांनी दिलं आहे. रवी राणांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, राणा हे बालिश आणि निंदनीय प्रकार करतात. ते दोघे अपक्ष उमेदवार आहेत. तुम्ही मुंबईत तेढ निर्माण करताय. शिवसैनिकांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करताय, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तसेच ते मातोश्रीसमोर आल्यास आम्ही मातोश्रीसमोर छातीचा कोट करून उभे राहणार, असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
शिवसैनिक हे नेहमी जागृत असतात. हे डिवचत आहेत. दंगली घडवायच्या आणि राष्ट्रपती राजवट आणायची हा सगळा यांचा डाव दिसतोय. हे नीचगिरी करत असतील तर केंद्राने आणि राज्याच्या गृह विभागाने याची नोंद घ्यावी. केंद्र सरकारची सेक्युरिटी मिळाल्यापासून यांना जास्त जोर आलाय. मुंबई शांत ठेवा शिवसैनिकांची माथी भडकावू नका, असा इशारा देखील किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
दरम्यान, अमरावतील येथील राणा कुटुंबीयांच्या घराकडे शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा वळवला होता. मात्र, पोलिसांनी वाटेतच त्यांना अडकवले. त्यामुळे, शिवसैनिकांनी रस्त्यातच राणा दाम्पत्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. तर, महिलांनी बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला. त्यावेळी, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेच्या आंदोलनात महिला आक्रमक दिसून आल्या. तर, भगवे झेंडे आणि हनुमानच्या वेशभूषेतील व्यक्तीही आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, शिवसैनिकांना रोखण्यासाठी राणा समर्थकही त्यांच्या घराबाहेर उभे होते.