मुंबई- माजी राज्यमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी रविवारी आमदार रवी राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. २३ ऑक्टोबर रोजी भादंविच्या कलम ५०१ अन्वये राणांविरोधात ती एनसी दाखल करण्यात आली. यानंतर आज अमरावतीत पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांचा समाचार घेतला.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बच्चू कडू यांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रवी राणा यांना इशारा दिला आहे.
राणा दाम्पत्यांची नौटंकी सुरु आहे. सी-ग्रेडपासून वर येण्यासाठी काय सूरू आहे आपण पाहतोय. बच्चू कडू हे चांगलं व्यक्तीमत्व आहे. ते राणांना पुरुन उरतील, असं विधान किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. आता त्यांना फेसबुक लाईव्हची गरज का पडली?, असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले ७ ते ८ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
...तर जशाच तसे उत्तर देवू- रवी राणा
आमदार बच्चू कडू जे काही करतात ते मला सांगायची गरज नाही. त्यांना सिद्धांत, विचार नाही. जे काही ते करतात, ते तोडपाणीसाठीच. दुसऱ्यांना दम देतात, गलिच्छ, बेछूट बोलतात. ते ज्या स्तरावर जातील, त्या स्तरावर मलाही जाता येते. मी खिसे कापून किराणा वाटप करतो, हे अगोदर सिद्ध करावे, असे रवी राणा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. कडू यांचे आंदोलन तोडपाणीसाठीच असते. यापूर्वी सोफिया प्रकल्पाचे आंदोलन सर्वांनाच माहिती आहे. आमचे आंदोलन शेतकरी, गरिबांसाठी झाले, दिवाळीत जेलमध्ये गेलो, हा इतिहास आहे. आमदार कडूंनी अरेरावीची भाषा बंद करावी, मी धमकीला भीत नाही, असे थेट आव्हान रवी राणा यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"